मी मराठी
बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या एका सहकार्याने माझ्या फ़ेसबुक एकाउंट कड़े बघून प्रश्न विचारला होता,
'तुम्ही सर्व सेटिंग्स मराठी का ठेवले आहेत? त्रास नाही होत काय सर्फिंग करताना??'
'होतो ना, त्रास तर होतोच जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोन च्या बाहेर काहीही करतो', मी उत्तरलो, 'पण एकदा सवय झाली की मग नाही होत तेवढा त्रास. आणि त्यानिमित्ताने नव्या टेक्नोलॉजीला आपल्या मातृभाषेत क़ाय म्हणतात हे तरी कळेल आपल्याला.'
'तू ना पक्का ठाकरे आहेस' माझे उत्तर ऐकून तो सहकारी म्हणाला.
आज हा किस्सा आठवण्याचे कारण म्हणजे आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. पण मराठीची दीन स्थिति बघता जगात किती ठिकाणी हा दिन साजरा होत असावा अशी शंका येते. तंत्रज्ञान आपल्या बोटावर येऊन ठेपलेले असताना 'जमाने के साथ' चालावेच लागणार आणि त्यासाठी जमाने की भाषा म्हणजे इंग्रजी ची साथ आवश्यक आहे. मात्र इंग्रजी आली पाहिजे म्हणून आपली मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला तिलांजली देण्याची काहीही गरज नाही, असे माझे मत आहे.
आपल्याला सहज साध्य असणाऱ्या लहान सहान गोष्टी जरी आपण आपल्या मातृभाषेसाठी करू शकलो तरी आपली माय मराठी जगु शकेल. आपण घरात मुलांशी मराठीत संवाद ठेवला, ATM मधे किंवा IVRS मधे मराठी हा पर्याय निवडला, गूगल आणि तत्सम वेब ब्राऊज़र वर मराठी ही आपली भाषा ठेवली तरीही पुढच्या पिढ्या मराठीला महत्त्व देतील. निदान माय मराठी साठी तेवढे तरी मी करू शकतो जेणेकरून मराठीत संवाद साधताना आपल्या पुढच्या पीढ़ीची अवस्था मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलीसारखी होणार नाही.
जय महाराष्ट्र जय मराठी👍
Comments